पुणे : पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रमाला पुण्यात सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजात बंधुता, ऐक्य आणि परस्पर सौहार्द वाढवण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम कॅम्प परिसरातील आझम कॅम्पस येथील असेंब्ली हॉलसमोरील बॅडमिंटन कोर्टावर उत्साहात पार पडला.

लष्कर पोलिस स्टेशन, जमियत उलेमा-ए-हिंद, पुणे आणि महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फ्रेंस यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धर्मांचे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पुणेकर या इफ्तार कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत इफ्तारमध्ये सहभागी होत सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश दिला.

कार्यक्रमाला पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय पोलिस विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांचे विशेष सहकार्य लाभले.
महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फ्रेंसचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन आणि जमियत उलेमा-ए-हिंद, पुणेचे अध्यक्ष कारी इद्रीस अन्सारी यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या इफ्तार कार्यक्रमातून परस्पर भाईचारा वाढवून देशात शांतता आणि सौहार्द टिकवण्याचा संदेश देण्यात आला.