शुभांगी सरोदे – पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी
पाचगणी : पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कासवंड धामुणसेवाडी येथील बांधकाम साईटवरून स्टील चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना पाचगणी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फिर्यादी डॉ. दीक्षित यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कासवंड धामुणसेवाडी येथील बांधकाम साईटवरून सिमेंटच्या प्लेटांसह अंदाजे ४५० किलोग्रॅम वजनाचे लोखंडी गज अज्ञात इसमांनी टेम्पोतून चोरून नेले होते. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे गतिमान केली.

तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांचा माग काढत अजय हनुमंत भुजबळ, रमेश ननवरे आणि चेतन दिलीप भगणे या तिघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार निलेश माने करत आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, एच. रसाळ, एस. एम. थोरवे, पोलिस हवालदार धायगुडे तसेच पोलिस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे आणि अमोल धर्मू जगताप यांनी सहभाग घेतला.