शुभांगी सरोदे -पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी
पुणे : घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरबाबत सरकारने महत्त्वाचा बदल केला असून आता सिलेंडरचे ऑनलाइन बुकिंग बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच पहिला सिलेंडर घेतल्यानंतर २६ दिवस पूर्ण झाल्याशिवाय दुसरा सिलेंडर बुक करता येणार नाही, अशी नवी अट प्रणालीत लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी या बदलाची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.

मध्यपूर्व आशियात इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांसह गॅस व पेट्रोल वितरकांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे संबंधित कंपन्या व वितरकांनी स्पष्ट केले. नागरिकांना नियमित आणि सुरळीत पुरवठा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, अफवांमुळे पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीवर होणारी अनावश्यक गर्दी टाळावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले.
तसेच जिल्ह्यातील गॅस एजन्सींच्या साठ्यांची नियमित तपासणी केली जाणार असून घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिला आहे.