पुणे : थेऊर परिसरात अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत पोलिसांनी ५३ किलो १४ ग्रॅम गांजा जप्त करत एका तरुणाला अटक केली. या कारवाईत सुमारे ४० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम रविंद्र कुंजीर (वय ३२, रा. धुमाळ मळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेऊर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

११ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास धुमाळ मळा, थेऊर नाका येथील रविंद्र कुंजीर यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. आरोपी प्रितम कुंजीर हा महाराष्ट्रात गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक, साठवण व विक्री करण्यास बंदी असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ५३ किलो १४ ग्रॅम वजनाचा सुमारे १० लाख ६० हजार २८० रुपयांचा गांजा बाळगून असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ३० लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार तसेच १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण अंदाजे ४० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार विजय शहाजी कांबळे (गुन्हे शाखा, पुणे) यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एन.डी.पी.एस. अॅक्ट) कलम ८(क), २०(ब)(ii)(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे पोलिस निरीक्षक वाहीद पठाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे तसेच फॉरेन्सिक मोबाईल व्हॅनवरील अधिकारी आकांशा तावरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *