शुभांगी सरोदे – पुरीगोसावी, प्रतिनिधी (सोलापूर जिल्हा)
वैराग (सोलापूर जिल्हा) :
वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतून इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले होते. या संदर्भात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.

त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन आरोपींना अटक करून सुमारे ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी आरोपी विशाल श्याम जाधव (रा. साठेनगर, जि. धाराशिव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पुढील तपासात त्याचा साथीदार समीर अल्ताफ सय्यद (रा. समर्थनगर, जि. धाराशिव) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींकडून सहा इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी व सुमारे चारशे फूट केबल असा एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, पोलिस हवालदार भोरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल आकाश पवार, राहुल पवार आदींनी पार पाडली.
वैराग पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरातील शेतकरी वर्गातून विशेष कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.