शुभांगी सरोदे-पुरीगोसावी, प्रतिनिधी (पुणे जिल्हा)
पिंपरी-चिंचवड : तब्बल सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला अखेर नवे आयुक्त मिळाले आहेत. कोकण विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनात आता नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाच्या वतीने सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी बुधवारी यासंदर्भातील आदेश जाहीर केले होते. २००६ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी असलेले डॉ. सूर्यवंशी हे प्रशासनात कडक, पारदर्शक आणि परिणामकारक कामासाठी ओळखले जातात.
डॉ. सूर्यवंशी यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिक स्कूल तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून 9 मार्च 2012 रोजी औद्योगिक विकास महामंडळ (एनआयडीसी) येथे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.

प्रशासनातील त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत ठसा उमटवला आहे. कोल्हापूर आणि पालघर जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागातील विकास योजनांना वेग दिला. त्यानंतर गोंदिया आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्य करताना पारदर्शक प्रशासन आणि विकास प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. सूर्यवंशी यांचे स्वागत करून त्यांना आयुक्तपदाचा पदभार सोपविला.
दरम्यान, तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी बदली झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. अखेर आता डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत.
महापालिकेतील प्रलंबित प्रकल्प, शहरातील पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील शिस्त या बाबींवर आता नव्या आयुक्तांचे लक्ष राहणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.