पुणे : हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर ‘सभापती-उपसभापती चषक’ स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकाच्या शाळेला २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी केली.

हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने थेऊर येथे आयोजित सत्कार समारंभात नवनिर्वाचित सभापती युवराज काकडे आणि उपसभापती विद्याताई गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमात हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या नव्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. सभापती व उपसभापती यांच्या हस्ते नव्या सदस्यांना निवडपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी कायम शिक्षकांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन सभापती युवराज काकडे आणि उपसभापती विद्या गायकवाड यांनी दिले.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ‘जिल्हा परिषद अध्यक्ष चषक’ या स्पर्धेच्या धर्तीवर हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी नवीन पुरस्कार योजना जाहीर करण्यात आली. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शाळेला सभापती चषक व २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी उपसभापती चषक व १५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी शिक्षक संघ चषक व १० हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहे.

या पुरस्कारांचे वितरण आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती काकडे यांनी दिली. तसेच तालुक्यातील सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन शाळेचा दर्जा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *