पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानाजवळ एका महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयश्री भरत काळे (वय ४३, रा. काळेवाडा, उरुळी कांचन) या दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.२५ वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानाजवळून जात असताना एका युवकाने त्याच्या ताब्यातील बजाज कंपनीची पल्सर २२० सीसी दुचाकी (आरटीओ क्रमांक एमएच १२ एमबी ८००७) वरून त्यांच्या पाठीमागे येत गळ्यातील मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केली.

चोरी करून आरोपी पळून जात असताना फिर्यादींचे पती व परिसरातील नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर संबंधित युवकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेत सुमारे २ लाख रुपये किंमतीचे २.५ तोळे वजनाचे काळे मणी असलेले सोन्याचे मिनी गंठण तसेच सुमारे ७० हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर २२० सीसी दुचाकी असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ६१/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.