पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त १७ मार्च २०२६ रोजी उरुळी कांचन येथील अलंकार मंगल कार्यालयात बायफ संस्थेच्या वतीने दौंड व हवेली तालुक्यातील १२० हून अधिक महिला बचत गटांचा आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास सुमारे १४०० महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. भावना थोरात उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. जयंत खडसे होते. यावेळी यशदाच्या निवृत्त सहाय्यक प्राध्यापक सौ. जयश्री ताडेलकर, बायफचे प्रोग्राम डायरेक्टर प्रमोदकुमार ताकवले, सीटीपीई डॉ. सचिन जोशी, विभाग प्रमुख व वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ. लता शर्मा तसेच संकल्पचे मार्गदर्शक सुरेश शिवतरे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महिलांनी लेझीमनृत्य व स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर बचत गटाची प्रार्थना झाली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. मणिभाई देसाई व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. पुढे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या डॉ. भावना थोरात यांनी महिलांच्या मनोबल वृद्धीसाठी प्रेरणादायी विचार मांडले. सौ. जयश्री ताडेलकर यांनी ‘स्वतःचा शोध’ या विषयावर प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

अध्यक्ष डॉ. जयंत खडसे यांनी बायफ संस्थेच्या महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बायफचे माजी कर्मचारी सुरेश शिवतरे यांच्या हस्ते कै. मंगला सुरेश शिवतरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २५ वर्ष पूर्ण केलेल्या बचत गटांचा गौरव करण्यात आला. यावेळी महिलांनी समाजजागृतीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. लता शर्मा यांनी केली. सूत्रसंचालन जयश्री मगर व सविता भोसेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन हनुमंत भोसले यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बायफचे विमल थोरात, सागर पारखे, राहुल खेडेकर, नीता खराडे, सविता कांचन तसेच गावपातळीवरील कार्यकर्त्या मंदा भोसेकर, नंदा इथापे, अरुणा शितोळे, जयश्री आगलावे, सुनिता वाईकर, सुजाता म्हेत्रे, उज्वला कड आणि विविध गावांतील क्लस्टर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *