पुणे : कैलासवासी पैलवान बाबासाहेब श्रीहरी मोकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली अठ्ठावीसावी राज्यस्तरीय सायकल स्पर्धा दिनांक एकोणीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता उत्साहात पार पडली. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल तरुण मंडळ, पौड फाटा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन मंदार बलकवडे, मोकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय सातपुते, आकाश मोकर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण पंचेचाळीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेचे आयोजन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. सहभागी खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शंकर केमसे, पुनीत जोशी, बलकवडे, सुधाकर मेमाणे, सुनील मोकर, संजय मरळ, मंदार बलकवडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने, हर्षल निकम, शफिक शेख, प्रकाश चुनेकर, मयूर कदम, विकास उपस्थित होते.
स्पर्धेतील निकालानुसार, प्रथम क्रमांक रवींद्र पाटील (कोल्हापूर) यांनी मिळवला, तर द्वितीय क्रमांक वीरेंद्र पाटील यांनी पटकावला. तृतीय क्रमांक हरीश डोंबाळे यांनी मिळवला. चतुर्थ, पाचवा आणि सहावा क्रमांक अनुक्रमे ओंकार खेडेकर, केशव मोरे आणि सुमित गुजर यांनी मिळवले.
स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी म्हणून राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय मार्गदर्शक बिरू भोजने यांनी सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व केले. आकाश मोकर आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा उत्कृष्टरीत्या पार पडली.