पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाचा मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या दिमाखदार समारंभात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
या सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
व्यसनमुक्ती चळवळीत केलेल्या उल्लेखनीय आणि प्रभावी कार्याची दखल घेत डॉ. गिते यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.

समाजजागृती, मार्गदर्शन आणि जनप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना व्यसनाच्या अंधःकारातून बाहेर काढत नवजीवन दिले आहे. या पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ यांचा समावेश आहे.
डॉ. गिते यांचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरवले गेले असून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स’, ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये त्यांच्या कार्याची नोंद झाली आहे. तसेच व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, सेवादूत पुरस्कार आणि राष्ट्रीय युवा आयकॉन पुरस्कार यांसारख्या सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
“हा पुरस्कार प्रत्येक व्यसनमुक्त व्यक्तीचा” *— डॉ. गिते
“व्यसनामुळे उद्ध्वस्त होत असलेली अनेक कुटुंबे मी जवळून पाहिली. त्यांच्या वेदनांनी मला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. त्या भावनेतूनच व्यसनमुक्तीच्या कार्याची सुरुवात केली. अनेकांना नवजीवन देण्याचा प्रयत्न केला, हीच माझी खरी कमाई आहे,” असे डॉ. गिते यांनी सांगितले.
“हा पुरस्कार केवळ माझा नसून व्यसनावर मात करून नव्याने आयुष्य उभारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. त्यांच्या जिद्दीला हा सन्मान अर्पण आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली असून पुढेही अधिक समर्पणाने काम करत राहीन,” असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, पुरस्काराची संपूर्ण रक्कम आणि तितकीच स्वतःकडून भर घालून स्वर्गीय आई वेणूताई यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी देणगी देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.