पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बुधराणी हॉस्पिटल यांच्या वतीने उरुळी कांचन येथे दर महिन्याच्या ६ तारखेला मोफत मोतीबिंदू निदान व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांना वेळेवर उपचाराची संधी उपलब्ध होत आहे.
हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात येत असून, अनुभवी नेत्रतज्ज्ञांकडून रुग्णांची सखोल तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान मोतीबिंदू किंवा इतर नेत्रविकार आढळल्यास रुग्णांना योग्य उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाते.

आवश्यकतेनुसार पुढील उपचारांची सोयही सुलभ करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेको पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया केवळ ५८०० रुपयांत करण्यात येणार असून, यामध्ये ७०० रुपये जेवण खर्च समाविष्ट आहे. तसेच बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाणार असून, रुग्णांना फक्त ७०० रुपये जेवण खर्च द्यावा लागणार आहे. याशिवाय, उत्कृष्ट दर्जाचे चष्मे केवळ १२० रुपयांत उपलब्ध करून देण्याची सुविधाही शिबिरात करण्यात आली आहे.
हे शिबिर श्रीराम मंदिर, गुळ आळी, सराफ गल्ली, उरुळी कांचन येथे भरविण्यात येत असून, बन्सीलाल पन्नालाल बलदोटा फाउंडेशन यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे संयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
नेत्रविकारांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करणे आवश्यक आहे. मोतीबिंदूसारख्या आजाराचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होतात. त्यामुळे नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ८३९०६७५८०० किंवा ८५५७९८५५८० या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी, असेही आयोजकांनी सांगितले आहे.