पुणे : थायलंडमधील श्रीराचा येथे १७ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड मास्टर्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाच्या ‘टीम डायरेक्टर’पदी महाराष्ट्रातील बाळू चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑल इंडिया मास्टर्स स्पोर्ट्स महासंघाचे सचिव रघु के. तसेच युनायटेड मास्टर्स गेम्स फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष प्रभाकर निंबाळकर यांनी ही घोषणा केली.

बाळू चव्हाण हे ठाणे शहर पोलिस दलात कार्यरत असून त्यांचा मूळ गाव कुसेगाव (ता. दौंड, जि. पुणे) आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मास्टर्स स्तरावर दीर्घ अनुभव आणि संघटन कौशल्य यामुळे चव्हाण यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघात एकूण ७८ पुरुष आणि महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पुरुष गटात बाळू चव्हाण, शशिकांत जितेकर, शरद माळवे, आनंद जितेकर, संतोष पवार, अमित विचारे, संतोष मुकनाक, रवींद्र बनसोड, शंकरभाई भुसारा, डॉ. तरुणकुमार देवरी, दिलीप फुकाण, प्रमोद साळुंखे, अथर्व साळुंखे, ओंकार गायकवाड, साहेबराव मोरे, शांताराम पाटील आणि सचिन शिराळे यांचा समावेश आहे.

महिला गटात खुर्शीद मिस्त्री, मून बरुआ, नलिनी कड, मयुरी रोकडे, योगिता जांभुळकर, मामोनी सैकिया, पल्लबी बरुआ, सुभा गुजरन, साधना दास, निशा आंबेकर, माधुरी साळुंखे, स्वस्तिका गिरकर आणि धनदा दत्ता या खेळाडूंचा सहभाग आहे.

भारतीय संघाकडून या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघ यश मिळवेल, असा विश्वास क्रीडा वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *