पुणे : सोरतापवाडी येथील हनुमान मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. गुरुवार दि. २६ मार्च ते गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या सप्ताहात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

संपूर्ण सप्ताहभर मंदिर परिसरात नामस्मरणाचा अखंड नाद घुमत राहिला. पहाटे काकड आरतीने दिवसाची मंगल सुरुवात होत असे, दिवसभर ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ तर रात्री कीर्तन व महाप्रसादाने भक्तीची अखंड धारा वाहत होती. हरीजागरामुळे वातावरण अधिकच आध्यात्मिक झाले होते.

या सप्ताहाचे व्यासपीठ ह.भ.प. सुधाकर महाराज सुरवडकर यांनी समर्थपणे सांभाळले. मृदुंग, हार्मोनियम, गायन व विणेकरी सेवेत विविध मान्यवरांनी योगदान देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. आठही दिवस विविध कीर्तनकारांनी आपल्या प्रभावी वाणीने भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले.

ग्रामस्थ व दाते यांच्या सहकार्यामुळे दररोज कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन सुरळीत पार पडले. अनेक कुटुंबांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ उदारहस्ते देणग्या देत या धार्मिक सोहळ्यात सहभाग नोंदवला.

सप्ताहाची सांगता गुरुवारी ह.भ.प. नवनाथ महाराज माशेरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सकाळी पार पडलेल्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

फुलांची आकर्षक सजावट, सुयोग्य नियोजन आणि समितीच्या अथक परिश्रमामुळे हा सप्ताह यशस्वी ठरला. भजनी मंडळे, दिंडी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली. आठ दिवसांच्या या भक्तिमय उत्सवाने गावात आनंद, समाधान आणि आध्यात्मिक उर्जेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *