बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावांच्या ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ साहेबांच्या यात्रा उत्सवाने यंदा भक्ती, परंपरा आणि क्रीडास्पर्धेचा अद्वितीय संगम घडवून आणला. हनुमान जयंतीनिमित्त गुरुवार (दि. २) व शुक्रवार (दि. ३) रोजी पार पडलेल्या या उत्सवात तब्बल २८ लाख रुपयांच्या इनामी कुस्त्यांनी आखाडा अक्षरशः दणाणून गेला. देश-विदेशातील नामांकित पैलवानांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली.
हनुमान जयंतीच्या पवित्र पहाटे चार वाजता श्रींच्या मूर्तीची महापूजा संपन्न झाली. त्यानंतर भाविकांनी भक्तिभावाने नैवेद्य अर्पण करत दिवसभर मंदिर परिसरात श्रद्धेचा उत्साह अनुभवला. रात्री छबिना व फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले, तर गावकऱ्यांच्या जल्लोषात भक्तीचा स्वर अधिकच दुमदुमला.

दुपारी चार वाजता पारंपरिक मिरवणूक खोकलाई देवी चौकातून वाजत-गाजत आखाड्याकडे निघाली. लोणी काळभोर, कदमवाकवस्ती येथील ग्रामस्थ, आजी-माजी पैलवान, ट्रस्टी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ही मिरवणूक भक्ती आणि अभिमानाचा सोहळा ठरली. श्रीमंत अंबरनाथ मंदिराला प्रदक्षिणा घालून मिरवणूक आखाड्यात दाखल झाली. तेथे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले आणि टोकनवरील कुस्त्यांना प्रारंभ झाला.
विविध गावांतून आलेल्या छोट्या-मोठ्या पैलवानांनी आपल्या कसबाची झलक दाखवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. गावातील अनुभवी पैलवानांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडत स्पर्धेची शिस्त राखली. त्यानंतर रंगलेल्या मुख्य कुस्त्यांनी वातावरणात थरार निर्माण केला. कुस्ती निवेदक प्रशांत भागवत यांच्या ओघवत्या समालोचनाने प्रत्येक डाव अधिक रंगतदार झाला.

या कुस्त्यांचे थेट प्रक्षेपण ‘कुस्ती-मल्लविद्या’ या यूट्यूब चॅनेलद्वारे तब्बल ५२ देशांत करण्यात आले. त्यामुळे गावातीलच नव्हे, तर जगभरातील कुस्तीप्रेमींना या सोहळ्याचा आस्वाद घेता आला. या उपक्रमासाठी पै. गणेश मानगुडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्पर्धेतील उत्कंठावर्धक क्षण म्हणजे अंतिम मोठी कुस्ती, ज्यात महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख व पै. पृथ्वीराज मोहोळ आमनेसामने आले. याशिवाय डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांनी हरियाणाच्या जसपाल सिंग यांच्यावर मात करत आपले वर्चस्व सिद्ध केले. आखाड्यातील पंच तसेच वेटलिफ्टिंगमध्ये यश मिळवणाऱ्या शुभम विजय काळभोर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कुस्तीप्रेमींनी समाधान व्यक्त केले. याचवेळी नियोजित श्रीमंत अंबरनाथ कुस्ती स्टेडियमची माहिती व्हिडिओद्वारे सादर करण्यात आली, ज्यामुळे भविष्यातील योजनांविषयी उत्सुकता वाढली.
घरबसल्या अनेक वृद्ध, महिला व बालकांनी यूट्यूबद्वारे कुस्त्यांचा आनंद घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि उत्साहपूर्ण सहभाग यामुळे अंबरनाथ यात्रा उत्सव यंदाही अविस्मरणीय ठरला.