बापुराव चौधरी, उपसंपादक

सातारा : बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दाम्पत्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात पत्नीचा पतीच्या डोळ्यांदेखत जागीच मृत्यू झाला, तर पती किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सौ. संस्कृती विजय वाघमारे (वय २१) असे मृत महिलेचे नाव असून, त्या रामकृष्णनगर येथील रहिवासी होत्या. संस्कृती आणि त्यांचे पती विजय वाघमारे हे बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. ध्रुव पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावरून चालत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात संस्कृती यांचा जागीच मृत्यू झाला, तर विजय वाघमारे जखमी झाले.

संस्कृती आणि विजय यांचा विवाह दीड वर्षांपूर्वीच झाला होता. या नवदाम्पत्यावर अचानक काळाने घाला घातल्याने ग्रामस्थांतून दुःख व्यक्त केले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह पसार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, संशयित सहा वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच काही डंपर चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *