बापुराव चौधरी, उपसंपादक
रांजणगाव (ता. शिरूर) : ११ महिन्यांच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक उलगडा करत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी स्वतःच्या आईनेच मुलाचा खून केल्याचे निष्पन्न केले आहे. या प्रकरणी आरोपी आईला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

भांबार्डे येथील रहिवासी रविंद्र अशोक पवार यांनी ५ एप्रिल २०२६ रोजी तक्रार दिली की, त्यांची पत्नी पूजा रविंद्र पवार (वय २२) ही ८ मार्च २०२६ रोजी ११ महिन्यांच्या मुलगा यशसह घरातून निघून गेली होती. दरम्यान, ५ एप्रिल रोजी जांबुत गावाच्या हद्दीत पूजा आढळून आली. टाकळी हाजी पोलीस चौकीत चौकशीदरम्यान तिने मुलगा ओट्यावरून पडून मृत झाल्याचे सांगत त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याची कबुली दिली.

या माहितीच्या आधारे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. मृतदेह विघटित अवस्थेत आढळून आल्याने जागीच पंचनामा व शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला.
तपास अधिक सखोल केल्यानंतर आरोपी पूजाने खळबळजनक सत्य उघड केले. मुलगा सतत रडत असल्याने आणि भविष्यात दुसरे लग्न करताना अडथळा ठरेल या विचारातून तिने मुलाचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बॅगेत भरून शेतातील विहिरीत दगडांसह फेकून दिल्याची कबुली तिने दिली.
या प्रकरणी रविंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५६/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व २३८(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी पूजा पवार हिला ६ एप्रिल २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करीत आहेत.