
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
उरुळी कांचन : पहाटेची प्रसन्न वेळ… मंदिराच्या गाभाऱ्यात तेवणाऱ्या दीपज्योती, टाळ-मृदंगाचा निनाद, मुखातून उमटणारा विठ्ठल नामाचा जयघोष आणि भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी… अशा मंगलमय वातावरणात हवेली तालुक्यातील शिंदवणे गावाची पहाट सध्या भक्तीच्या स्वरांनी उजळून निघत आहे. संत यादव बाबा भजनी मंडळाच्या वतीने श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात दररोज पहाटे आयोजित करण्यात येणाऱ्या काकड आरतीमुळे संपूर्ण गावात आध्यात्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहाटेच्या निरव शांततेत मंदिरातील घंटानाद आणि टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर जागृत होतो. संत यादव बाबा भजनी मंडळातील वारकरी आणि भजनी मंडळी एकत्र येत अभंग, भजन, हरिपाठ आणि काकड आरतीच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी भक्तिभावाने लीन होतात. ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामाचा अखंड गजर आणि भक्तांच्या स्वरांतून उमटणारे अभंग यामुळे मंदिर परिसर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघतो. या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात उपस्थिती दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, या काकड आरतीमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण आणि लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग असतो. दैनंदिन धावपळीच्या जीवनातून काही क्षण अध्यात्मासाठी देत ग्रामस्थ एकत्र येत असल्याने गावातील सामाजिक आणि धार्मिक सलोखाही अधिक दृढ होत आहे. भक्तीच्या माध्यमातून माणसामाणसांतील नाती जोडण्याचे आणि सामूहिक एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्याचे काम या उपक्रमातून होत आहे.
आजच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात नव्या पिढीला संतांचे विचार, वारकरी संप्रदायाची शिकवण आणि नामस्मरणाचे महत्त्व समजावे, हा अशा उपक्रमांमागील महत्त्वाचा उद्देश आहे. संत साहित्य, अभंगवाणी आणि हरिनामाच्या माध्यमातून संस्कारांची शिदोरी पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संत यादव बाबा भजनी मंडळाकडून सातत्याने केले जात आहे.

काकड आरतीनिमित्त दररोज गावातील दानशूर व्यक्तींच्या वतीने भाविकांसाठी प्रसादाचे आयोजनही करण्यात येते. त्यामुळे भक्ती, सेवा आणि समर्पण यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.
संतांच्या विचारांचा सुगंध जपत हरिनामाची परंपरा अखंडित ठेवणाऱ्या या उपक्रमामुळे शिंदवणे गावाची पहाट केवळ उजाडत नाही, तर ती भक्तीच्या प्रकाशाने उजळते आहे. टाळ-मृदंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा गजर आणि सामूहिक भक्तिभाव यामुळे शिंदवणेकरांच्या दिवसाची सुरुवातच आनंदमयी आणि मंगलमयी होत आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक
