बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : शिरूर परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातून १३ ग्रॅम वजनाचा माफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे १ लाख ४ हजार रुपये असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिली.

दहशतवाद विरोधी पथक शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार ओंकार शिंदे व मोसीन शेख यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. शिरूर बायपास परिसरातील ‘एम्पायर पान व्हिला’ येथे साहील संदीप करंजुले (वय २०, रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हा एमडी अंमली पदार्थ साठवून ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेषांतर करून सापळा रचला. कारवाईदरम्यान साहील करंजुले याच्यासह ओंकार संजय धावडे (वय २३, रा. रामलिंग रोड, शिरूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत १.०४ लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले तसेच पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, तसेच पोलीस कर्मचारी निलेश कदम, रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक आणि शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते करीत आहेत.