बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : स्वतःच्या वार्षिक उत्पन्नातील तब्बल २० टक्के रक्कम समाजकार्यासाठी खर्च करत, पत्रकार समाधान भागवत काटे हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत मागील दहा वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय कार्य करत त्यांनी ‘कर्तव्यदक्ष व समाजभान जपणारा पत्रकार’ अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सध्या पुण्यातील एका नामांकित मराठी वृत्तपत्रात बातमीदार म्हणून कार्यरत असलेले काटे यांनी २०१६ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था’ स्थापन केली. लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी या संस्थेमार्फत विविध समाजोपयोगी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू ठेवली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे शिवजयंती साजरी करण्यास त्यांनी सामाजिक उपक्रमांची जोड दिली.

पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह राज्यातील विविध भागांत संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. सोलापूरमध्ये स्थानिक वृत्तपत्रात बातमीदार ते व्यवस्थापक असा तीन वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजमधून ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ ही पदवी संपादन केली.

२०११ पासून माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले काटे आरोग्य, शिक्षण, गुन्हेगारी, राजकारण आणि सामाजिक विषयांवर प्रभावी वार्तांकन करत आहेत. ‘समाजकार्यातून राष्ट्रप्रगती’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
काटे यांचे कार्य हे केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित नसून समाजाला दिशा देणारे आणि माणुसकी जपणारे आहे. अशा कार्याला साथ देणे म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यात आपला वाटा उचलणे होय, असे मत व्यक्त केले जात आहे.

निवडक सामाजिक उपक्रम

विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप
मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे
स्वच्छता अभियान व आपत्ती व्यवस्थापन उपक्रम
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान
‘शिवसंस्कार शिबीर’द्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
रक्तदान शिबिरे
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन

“पत्रकारिता करत असताना सामाजिक भान जपणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदतीचा हात द्यावा. केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. आपली छोटीशी मदत देखील एखाद्याचे आयुष्य बदलू शकते.”
— समाधान काटे, संस्थापक/अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *