बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : चंदननगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा पुणे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उलगडा करत तिघा आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील रहिवासी दिनेश उध्दवराव मुन (वय ३९) यांच्या पत्नी पुनम दिनेश मुन हिचे अॅड. संजय सावंत यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयातून अॅड. सावंत यांची पत्नी स्वाती सावंत, त्यांची मुलगी व स्वतः अॅड. संजय दत्तात्रय सावंत यांनी संगनमताने कट रचला.

दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत चंदननगर येथील जुना मुंढवा रोडवरील कार्यालयात पुनम मुन हिचा निर्घृण खून करण्यात आला. तिचे हात-पाय दोरीने बांधून डोक्यावर, तोंडावर बॅटने तसेच धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक १६१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ६१(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (सुधारणा) अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ३(२)(va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत आरोपी अॅड. संजय सावंत व त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तर मुख्य महिला आरोपी स्वाती सावंत हिला गुन्हे शाखेच्या खंडणी विभाग-२ ने अटक केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चंदननगर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.