बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत’ मंडल भाग थेऊर येथे शनिवार, दि. २ मे रोजी भव्य ‘समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे शासकीय विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्न या शिबिरात तत्काळ निकाली काढले जाणार असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी दिली.

थेऊरफाटा–ठेऊर रस्त्यावरील आशिर्वाद बॅक्वेट हॉल येथे हे शिबिर होणार असून, थेऊर, कोलवडी, साष्टे, कुंजीरवाडी आणि मांजरी बु. या गावांचा यात समावेश आहे. तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलीस, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, पाटबंधारे व महावितरण विभागांचे अधिकारी लाभार्थ्यांच्या यादीसह उपस्थित राहणार आहेत.

शिबिराच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी (दि. ३० एप्रिल) ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान नियुक्त अधिकारी व कर्मचारी नागरिकांकडून थेट अर्ज स्वीकारणार असून, शिबिराच्या दिवशी लाभार्थ्यांना तत्काळ प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

कामाच्या नियोजनासाठी अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी सजा निहाय पथकांची नियुक्ती केली आहे. यात थेऊर, कुंजीरवाडी, कोलवडी/साष्टे आणि मांजरी बु. येथे स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत.

या शिबिरात घरकुल योजना, रेशनिंग धान्य पुरवठा, जाती, उत्पन्न व रहिवासी दाखले, जमीनविषयक प्रकरणे, तुकडेबंदी नियमितीकरण, वीज समस्यांचे निराकरण, संजय गांधी निराधार, दिव्यांग, पीएम किसान व नमो किसान योजना, कृषी व आरोग्य विषयक सेवा, तसेच ७/१२ दुरुस्ती, ई-मोजणी व फेरफार आदी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दरम्यान, या शिबिरात सेवा देताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *