बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. मणिभाई देसाई यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य समारंभात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, टिंबर मार्केट, पुणे येथे झालेल्या या सोहळ्यात संगीत व कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. शिवराज साने यांना ‘उत्कृष्ट संगीतकार’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

गेल्या दोन दशकांपासून ऊरूळी कांचन व परिसरात ‘साने संगीत क्लासेस’च्या माध्यमातून साने सरांनी संगीत शिक्षणाची अखंड साधना सुरू ठेवली आहे. नाममात्र शुल्कात विद्यार्थ्यांना दर्जेदार संगीत शिक्षण उपलब्ध करून देत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला.

विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी घेतलेली अथक मेहनत, तसेच महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे त्यांच्या कार्याची सर्वत्र दखल घेतली गेली आहे. आकाशवाणी रेडिओ केंद्रावरही त्यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर करून संगीत क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे.

या समारंभाला खादी ग्रामोद्योग मंत्री ना. रविंद्र साठे, राष्ट्रपती पदक विजेत्या पी.एस.आय. जयश्री पाटील यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प. डॉ. रविंद्र भोळे (हिंदू रत्न पुरस्कार विजेते) यांच्या संकल्पनेतून प्रमुख राष्ट्रसेवा समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साळवे सर यांनी ओघवत्या शैलीत केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नार्मन नार्टन सर यांनी व्यक्त केले. संगीतसेवेच्या या गौरवमयी क्षणाने संपूर्ण सभागृहात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *