बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण व वार्षिक निकाल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गौरव करण्यात आला.

विद्यालयातील ध्वजारोहण श्रीहरीदादा कोतवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश देत, शालेय जीवनापासूनच कठोर परिश्रमाची सवय लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “अभ्यासात सातत्य ठेवल्यास भविष्यात निश्चित यश मिळते,” असे त्यांनी सांगितले.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. सहशिक्षक नवनाथ भागवत यांनी संपूर्ण विद्यालयाच्या निकालाचा गोषवारा सादर करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.

कार्यक्रमास अष्टापूरच्या सरपंच पुष्पा कोतवाल, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संस्थेचे नियामक मंडळ सदस्य रमेशबापू कोतवाल, स्कूल कमिटी सदस्य तयाजी जगताप, विजय कोतवाल, नितीन मेमाणे, दिवाकर पिंगळे तसेच संस्था समन्वयक व माजी मुख्याध्यापक सुभाष काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय रामदास कोतवाल, दीपक कोतवाल, नाना कोतवाल, विक्रम कोतवाल, प्रशांत भोरडे, अप्पा जगताप, हनुमंत जगताप, गुंडूराम साळवे यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन मेमाणे यांनी आपल्या मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका दिपाली दळवी यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर सहशिक्षक चौरंगनाथ कामथे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी पालकांनीही मोठी गर्दी केली होती.