बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) उरुळीकांचन येथून मोक्का गुन्ह्यातील आणि येरवडा कारागृहातून पळालेला सहा वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अजिंक्य उत्तम कांबळे (वय ३१, रा. टिळेकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याला शनिवारी (दि. २ मे) शिताफीने अटक केली.

२३ डिसेंबर २०१९ रोजी कांबळे व त्याच्या साथीदारांनी उरुळी कांचन येथील प्लॉटिंग व्यावसायिक विशाल खेडेकर यांचे अपहरण करून त्यांना २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी मारहाण केली होती. कोयत्याचा धाक दाखवत खंडणी न दिल्यास जीव मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी कांबळेसह साथीदारांना अटक करून येरवडा कारागृहात ठेवले होते.

जून २०२० मध्ये कांबळे व अन्य पाच आरोपींनी कारागृहातील खिडकीचे गज काढून पळ काढला होता. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले, मात्र कांबळे सहा वर्षांपासून फरार होता.

कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खंडणी, गंभीर दुखापत, मोक्का, आर्म अ‍ॅक्ट व चोरी असे एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून धोका असल्याने फिर्यादी विशाल खेडेकर यांना गेल्या सहा वर्षांपासून पोलिस संरक्षण देण्यात आले होते.

दरम्यान, कांबळे हा नाव बदलून व वेषांतर करून परराज्यात वास्तव्यास असल्याची माहिती एटीएस पथकाला मिळाली होती. तसेच तो अवैध गावठी शस्त्र विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याचेही समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून उरुळीकांचन-सोलापूर मार्गावरून त्याला ताब्यात घेतले.

कांबळेला फरार राहण्यास कोणी मदत केली, तसेच त्याचे इतर संपर्क कोण होते, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

सदर कामगिरी ही पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल व बारामती अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश गायकवाड, पोलिस हवालदार निलेश कदम, सुनिल कोळी, पोलिस कॉन्स्टेबल मोसीन शेख, ओंकार शिंदे यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *