बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊर मंडलात आयोजित करण्यात आलेल्या भव्य “महाराजस्व समाधान शिबिराला” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. थेऊरफाटा–थेऊर रस्त्यावरील आशिर्वाद बॅन्क्वेट हॉल येथे हे शिबिर पार पडले.

पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागांचा समन्वय साधत नागरिकांच्या समस्या एकाच ठिकाणी आणि जलदगतीने सोडविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरल्याचेही सांगण्यात आले.

तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत शिबिराचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. थेऊर, कोलवडी, साष्टे, कुंजीरवाडी आणि मांजरी बु. या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

शिबिरात महसूल, पोलीस, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, समाजकल्याण, वन विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, निवासी दाखले, सातबारा उतारे, फेरफार, वारस नोंद, ई-मोजणी, तुकडेबंदी नियमितीकरण, पीएम किसान, नमो किसान, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना तसेच ग्रामपंचायत करसंबंधित प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात अर्ज स्वीकारण्यात आले. अनेक प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला, तर काही लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटपही करण्यात आले.

या कार्यक्रमास पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, लोणी काळभोर अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, अतिरिक्त गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, जि. प. सदस्या शितल कांबळे, सुरेखा हरगुडे, संदेश आव्हाळे, दिलीप वाल्हेकर, पंचायत समिती उपसभापती विद्याताई गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या अभियानामुळे शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत वेगाने पोहोचत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *