सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : थेऊरफाटा ते थेऊर मार्गावरील उड्डाणपुलाला तब्बल पाच ते दहा फुटांचे खोल भगदाड पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच पुलाच्या काही भिंतींना तडे गेल्याचे निदर्शनास आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवेली पंचायत समिती सभापती युवराज हिरामण काकडे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भगदाडाच्या ठिकाणी बॅरीगेट लावून खबरदारीचा उपाय करण्यात आला.

पाहणीदरम्यान पुलाच्या भिंतींना तडे गेल्याचे आढळून आल्याने काकडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष रस्ते प्रकल्प विभागाकडे उड्डाणपुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिल्या.

थेऊर येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. तसेच पुणे-सोलापूर महामार्ग आणि पुणे-नगर महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष न करता तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पुलाखाली रेल्वे मार्ग असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली. कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असे मतही नागरिकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *