सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : अष्टविनायक महामार्गावरील लोणीकंद ते थेऊर दरम्यान थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या (ROB) पोहोच मार्गावर मोठे आणि खोल खड्डे पडल्याने वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी या मार्गावरील जड वाहतूक तात्पुरती बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे यांनी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे शहर वाहतूक शाखेकडे केली आहे.

सार्वजनिक बांधकाम प्रकल्प उपविभाग क्र. २, पुणे यांनी ९ मे २०२६ रोजी याबाबत पत्र पाठविले होते. त्यानंतर १० मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीत रेल्वे उड्डाण पुलाच्या पोहोच मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्याचे दिसून आले. डांबरी पृष्ठभागाखालील विविध ग्रेडचे थरही बाधित झाल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले.
अष्टविनायक महामार्गावरील किमी ५६/०४० येथे असलेल्या या ROB परिसरातील खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला असून, विशेषतः जड वाहनांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ वाहतूक नियंत्रण उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक