सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (ता. २०) उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या तब्बल २ हजार ८०० विद्यार्थ्यांनी सामूहिक योगाभ्यासात सहभागी होत योगाचे महत्त्व अनुभवले.

विद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात योगाचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये त्याची भूमिका याविषयी मार्गदर्शनाने झाली. त्यानंतर विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानप्रक्रियेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

या प्रसंगी उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचे योगाचार्य जालिंदर वाडेकर, तुषार जगदाळे, क्रीडा शिक्षक संतोष टिळेकर, प्रमोद चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शरीराची लवचिकता वाढते, मन एकाग्र राहते तसेच ताणतणाव कमी होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

यांनी विद्यार्थ्यांसमोर विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, सूर्यनमस्कार तसेच विविध प्राणायाम प्रकारांचा सराव केला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने योगाभ्यास करत कार्यक्रम यशस्वी केला.

कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राचार्या संगीता शिर्के, उपप्राचार्य दादा यदा , पर्यवेक्षक सत्यवान जगताप, पृथ्वीराज कड, अविनाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्या संगीता शिर्के यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची प्रभावी जीवनशैली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित योगाभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले.

संपूर्ण विद्यालय परिसरात उत्साह, शिस्त आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले होते. सामूहिक योगाभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच योगाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे यंदाचा योग दिन विद्यालयासाठी संस्मरणीय ठरला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *