सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : भारताची जीवनदृष्टी ही उदार, सहिष्णू आणि विज्ञानाधिष्ठित असून, हजार वर्षांच्या संकटातून जागृत झालेला भारत आज उत्थानाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी तथा चाणक्य मंडल परिवाराचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

प्रख्यात लेखिका व संशोधक अमी गणात्रा लिखित ‘Why Are We This Way: A Guide to Hindu Shastras’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात नेशन फर्स्ट आणि चाणक्य मंडल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी नेशन फर्स्टचे संस्थापक सुनील भोसले, बोध संस्थेचे संस्थापक व लेखक पंकज सक्सेना, मेजर वंदना शर्मा, डॉ. सुधीर काळकर, डॉ. वासुदेव ऐतल, केदारनाथ चक्रदेव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच हडपसरच्या विकासात मोलाचे योगदान देणारे रघुनाथ तुपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

धर्माधिकारी म्हणाले, ‘‘सनातन म्हणजे भारतीय आणि भारतीय म्हणजेच हिंदू होय. भारताचा विचार शाश्वत असून, अमी गणात्रा यांनी तो आपल्या पुस्तकातून अत्यंत सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने मांडला आहे.’’

अमी गणात्रा म्हणाल्या, ‘‘भारत हा ब्रिटिशांनी निर्माण केलेला देश नसून त्याला रामायण, महाभारत आणि वेदांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. काळानुरूप समाजात बदल झाले असले तरी हिंदू संस्कृतीमध्ये विवेकबुद्धीला नेहमीच महत्त्व राहिले आहे. हिंदू शास्त्रांमधून विवेक जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो.
तीर्थयात्रा, नदीपूजा यांसारख्या परंपरांमागील भावार्थ समजून घेतल्यास त्यांचे सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधिक स्पष्ट होते.’’पुस्तकाच्या संकल्पना, विषयाची पार्श्वभूमी आणि लेखनामागील प्रेरणा याविषयीही त्यांनी यावेळी माहिती दिली.

लेखक पंकज सक्सेना यांनी हिंदू धर्मातील शास्त्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली. विवेकबुद्धी जागृत ठेवण्यासाठी ध्यान आणि चिंतन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नेशन फर्स्टचे संस्थापक सुनील भोसले यांनी संस्थेचे ‘संघटित रहेंगे, सुरक्षित रहेंगे’ हे ब्रीद अधोरेखित करत हिंदू जनजागृती आणि समाजोन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सूत्रसंचालन संयुक्ता भोसले यांनी केले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *