
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली दळवी व सहशिक्षिका सुषमा दरेकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास याविषयी मार्गदर्शन केले. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून, त्याच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायद्यांविषयी जनजागृती करणे आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी २१ जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस असून भारतीय संस्कृतीत हा काळ योगसाधनेसाठी अनुकूल मानला जातो, अशी माहिती देण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. १७५ देशांच्या पाठिंब्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आल्याचा इतिहासही विद्यार्थ्यांना सांगण्यात आला.

शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सुरेश ओंबळे, सहशिक्षक चौरंगनाथ कामथे तसेच सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर योगसाधना केली. यावेळी योगामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, स्नायू बळकट होतात, शरीराची लवचिकता वाढते, फुफ्फुसांची क्षमता सुधारते, पचनक्रिया सुरळीत राहते तसेच मानसिक शांतता लाभते, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल साधणारी प्राचीन जीवनपद्धती असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब ढवळे तसेच नवनाथ भागवत, सविता शितोळे, अनिल कुंजीर, कल्पना तांबे, हरिश्चंद्र खेडेकर, सुहास भुजबळ, अमर वारे, दीपिका गायकवाड, प्रियांका कोतवाल आणि राजश्री कोतवाल उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप उत्साही वातावरणात झाला. आभार प्रदर्शन चौरंगनाथ कामथे यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन योगाविषयी नव्याने उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले.
बापुराव चौधरी उपसंपादक