
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : मणिभाई देसाई पतसंस्था, उरुळी कांचनचे अध्यक्ष राजेंद्र बापू कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त टिळेकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता. ११) पी.टी. ड्रेसचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमावेळी टिळेकरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुभाष लोणकर यांनी गावातील विविध विकासकामांची माहिती दिली. तसेच आगामी काळात मणिभाई देसाई पतसंस्थेच्या सीएसआर निधीतून अथवा संस्थेच्या वतीने गावाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. राजेंद्र बापू कांचन हे टिळेकरवाडी गावासाठी वेळोवेळी सढळ हाताने मदत व सहकार्य करीत असल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संचालक संजय तुळशीराम टिळेकर, संगीता टिळेकर आणि रामदासभाई चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा व इतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

कार्यक्रमास गावचे सरपंच सुशील राऊत, माजी सरपंच सुभाष लोणकर, माजी सरपंच गणेश टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य वैशाली चौरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हर्षदा टिळेकर, मुख्याध्यापिका सुवर्णा वडावराव, पोलिस पाटील विजय टिळेकर, माजी सरपंच निता टिळेकर, लक्ष्मण टिळेकर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच सुशील राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बापुराव चौधरी उपसंपादक
