
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (MSIDC) अधिकाऱ्यांकडे केली आहे.

हडपसर-उरुळीकांचन मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने खराब रस्त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

याशिवाय, या मार्गावर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL)च्या गॅस पाइपलाइनच्या कामामुळे रस्त्यालगतचा साइड पट्टाही खराब झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक ठिकाणी घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर सभापती युवराज काकडे यांनी NHAI आणि MSIDCच्या अधिकाऱ्यांकडे रस्त्याची तातडीने पाहणी करून मुख्य रस्त्यासह साइड पट्ट्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी केली आहे.

हडपसर ते उरुळी कांचन हा पुणे-सोलापूर महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब असून, कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी काकडे यांनी केली.

दरम्यान, पुणे-सोलापूर आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गावर नव्याने होणाऱ्या बहुमजली उड्डाणपुलांच्या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांच्या नेतृत्वाखाली येत्या काही दिवसांत NHAI व MSIDCचे अधिकारी, पदाधिकारी, रस्त्यालगतचे शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यासमवेत संयुक्त पाहणी व समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही सभापती युवराज काकडे यांनी दिली.
बापुराव चौधरी उपसंपादक
