सुवर्णा कांचन मुख्य संपादक

उरुळी कांचन : येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिराच्या पूर्वप्राथमिक विभागात शुक्रवारी (दि. ९) ‘आजी-आजोबा दिन’ उत्साहपूर्ण आणि भावस्पर्शी वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीतील ज्येष्ठांच्या सन्मानाची परंपरा जपत चिमुकल्यांनी आपल्या आजी-आजोबांचे औक्षण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रेम, आपुलकी आणि संस्कारांचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आजी-आजोबांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर रंगीबेरंगी वेशभूषेतील चिमुकल्यांनी आजी-आजोबांसाठी आकर्षक नृत्य सादर केले. बालकांच्या निरागस हालचाली आणि मनमोहक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. नातवंडांच्या कलाविष्कारातून उमटणारा आनंद आणि आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरील समाधान यामुळे कार्यक्रमाला भावनिक किनार लाभली.

आजी-आजोबांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. वयाचे बंधन बाजूला ठेवत आजी-आजोबांनी या खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. खेळांतील विजेत्यांना शाळेच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेजल जगताप आणि कुंभार मॅडम यांनी केले.

समारोपप्रसंगी नातवंडांसाठी वेळ देणाऱ्या आणि शाळेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या आजी-आजोबांचे आभार मानण्यात आले. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला ज्येष्ठांविषयी आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना जपण्याची प्रेरणा मिळते. नातवंडे आणि आजी-आजोबा यांच्यातील भावबंध अधिक दृढ करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी आनंददायी ठरला.

यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्वला साळुंके, शाळेचे मार्गदर्शक चव्हाण सर, सहशिक्षिका स्वाती कांचन आणि बालवाडी विभागप्रमुख जगताप मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांचन, उपाध्यक्ष सुरेश सातव, सचिव पंडित कांचन, खजिनदार प्रकाश कांचन, व्यवस्थापक संभाजी कांचन, संस्थेचे सर्व विश्वस्त आणि मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षकवृंदाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *