
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : जिद्द, मेहनत, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या जोरावर छोट्या जागेतून उद्योगाची सुरुवात करून राष्ट्रीय स्तरावर यशाची मोहोर उमटविणाऱ्या पुण्यातील रूपेश शिवरकर आणि गणेश जाधव यांच्या उद्योजकीय प्रवासाचा गौरव झाला आहे. त्यांच्या संयुक्त भागीदारीतून उभ्या राहिलेल्या मायक्रोटेक पॉलिमर्स या उद्योगाला भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (BYST) यांच्यातर्फे प्रतिष्ठेचा ‘JRD टाटा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. ‘फास्टेस्ट ग्रोइंग आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ या श्रेणीतील हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

नवी दिल्लीतील हॉटेल शांग्री-ला इरोस येथे झालेल्या या सोहळ्यास पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष प्रा. एस. महेंद्र देव, राज्यसभा खासदार विजय चिंताकायला, BYST च्या संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त लक्ष्मी वेंकटरमण वेंकटेशन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शिवरकर आणि जाधव यांनी २०१९ मध्ये अवघ्या ३०० चौरस फुटांच्या जागेतून मायक्रोटेक पॉलिमर्सची मुहूर्तमेढ रोवली. मर्यादित साधनसामग्री असतानाही नियोजन, परिश्रम आणि व्यावसायिक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी उद्योगाचा विस्तार केला. आज कंपनीकडून पफ व सँडविच पॅनेल उद्योग, प्लॅन्ट टिश्यू कल्चर लॅब तसेच गारमेंट उद्योगासाठी विविध प्लास्टिक उत्पादनांची निर्मिती केली जाते. देशातील २१ राज्यांसह परदेशातील १० देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय विस्तारला असून १५० हून अधिक ग्राहकांना उत्पादने पुरविली जातात.

या यशस्वी वाटचालीत BYST चे मेंटर सौमित्र घोटीकर यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. व्यवसायवृद्धी, नियोजन आणि विविध आव्हानांवर मात करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाल्याचे भागीदारांनी सांगितले. तसेच दोन्ही कुटुंबीयांची साथ, कंपनीतील कर्मचाऱ्यांचे योगदान, ग्राहकांचा विश्वास आणि हितचिंतकांचे सहकार्य यामुळेच हा टप्पा गाठता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हा पुरस्कार केवळ व्यावसायिक यशाचा नसून संघर्ष, विश्वास, कुटुंबीयांचा त्याग आणि सामूहिक प्रयत्नांचा सन्मान असल्याचे दोन्ही उद्योजकांनी नमूद केले. भविष्यात जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची ओळख अधिक भक्कम करण्यासह उद्योगाचा विस्तार करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
बापुराव चौधरी उपसंपादक
