
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : पुणे जिल्हा परिषदेमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शेतकरी, पशुपालक आणि महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

यामध्ये पशुपालकांसाठी मिल्किंग मशीन, मुरघास युनिट, जनावरांसाठी रबर मॅट आणि कडबा कुट्टी मशीन उपलब्ध करून देण्याच्या योजनांचा समावेश आहे. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तलंगा पक्षी वाटप आणि दोन शेळ्यांचे वाटप अशा योजनाही राबविण्यात येणार आहेत.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकृत योजनेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. अनुदानाचा लाभ योजनेच्या अटी, पात्रता आणि उपलब्ध निधीनुसार दिला जाणार आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक आणि महिला भगिनींनी या योजनांचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसायाला चालना द्यावी, आर्थिक उत्पन्न वाढवावे आणि आधुनिक साधनांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ :
https://zppunecessyojana.com/
अधिक माहितीसाठी हवेली पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी यांच्याशी अथवा पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक
