सुवर्णा कांचन मुख्य संपादक

आव्हाळवाडी : दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आव्हाळवाडी ग्रामपंचायतीसमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. प्रतिक विजय आव्हाळे व इतर दिव्यांग लाभार्थ्यांनी शुक्रवार (दि. २०) पासून हे आंदोलन सुरू केले होते. घरपट्टीच्या ५० टक्के रकमेचा परतावा आणि दिव्यांग बचत गटांना अनुदान देण्याच्या मागण्यांना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ग्रामपंचायत आव्हाळवाडीने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार, सन २०२५-२६ आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षांत १०० टक्के घरपट्टी भरलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना नियमानुसार ५० टक्के रक्कम परत करण्यात येणार आहे. हा परतावा येत्या १५ दिवसांत संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

तसेच दिव्यांग महिलांच्या बचत गटांना सहाय्यक अनुदान देण्यासह दिव्यांग स्वयंसहाय्यता बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायतीने सकारात्मक भूमिका घेतली आहे. यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी बचत गट स्थापन करून बँकेत खाते उघडावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, दिव्यांगांच्या तक्रारींची पंचायत समिती हवेली प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे. गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी (पंचायत) पोपट केदारी यांना पत्र देऊन तक्रारीतील सर्व मुद्द्यांची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २५ जून २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार नियमोचित कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात प्रतिक विजय आव्हाळे यांनी १९ नोव्हेंबर रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. ग्रामपंचायतीचे लेखी आश्वासन आणि पंचायत समितीकडून चौकशीचे आदेश मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मात्र, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का, १५ दिवसांत घरपट्टी परतावा खात्यात जमा होतो का आणि दिव्यांग बचत गटांना अनुदान मिळते का, याकडे आता लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा महत्त्वाचा ठरणार आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *