
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या जाचक अटींमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः १९५० पूर्वी जन्म झालेल्या व्यक्तींना त्यांच्या जन्मस्थळाच्या संबंधित तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच जात प्रमाणपत्र दिले जाते. ही अट रद्द करून नागरिक सध्या ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्याच ठिकाणच्या तहसील कार्यालयातून जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) पुणे येथील समाजकल्याण उपायुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले. डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पश्चिम विभाग महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ अडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र काढताना १९५० पूर्वी जन्म झालेल्या व्यक्तींना जन्म झालेल्या ठिकाणच्या तहसील कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, अनेक नागरिक रोजगार, व्यवसाय किंवा अन्य कारणांमुळे आपल्या मूळ गावापासून दूर स्थलांतरित झाले आहेत. काही नागरिक तर महाराष्ट्राबाहेरील अन्य राज्यांत स्थायिक झाले आहेत. अशा परिस्थितीत केवळ जन्मस्थळाच्या तहसील कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करणे त्यांच्यासाठी अत्यंत गैरसोयीचे ठरत आहे.

या प्रक्रियेमुळे नागरिकांना वारंवार प्रवास करावा लागतो. त्यात वेळ आणि पैशांचा अपव्यय होण्याबरोबरच आर्थिक व मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे सध्याच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या तहसील कार्यालयातच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून जात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची पर्यायी व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव तथा कोअर कमिटी सचिव राहुल अडागळे, पुणे शहराध्यक्ष मिथुन शिंदे, पुणे शहर मातंग समाजाचे सचिव दीपक कसबे, पुणे महिला जिल्हाध्यक्ष कविताताई कांबळे आणि हवेली महिला तालुकाध्यक्ष मंगलताई कांबळे उपस्थित होते.

समाजकल्याण उपायुक्त प्रशांत चव्हाण यांना हे निवेदन देण्यात आले. या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा या प्रश्नावर डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक