
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता यावी, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी व्यवसायाभिमुख साहित्य पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील पात्र महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती सुदर्शन चौधरी सदस्य हवेली पंचायत समिती, भाजप गटनेते तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत महिलांना पिठगिरणी, शिलाई मशीन तसेच ब्युटी पार्लरचे साहित्य यापैकी आवश्यकतेनुसार व्यवसायाभिमुख साहित्याचा लाभ घेता येणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रोत्साहित करणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांच्या आत असणे बंधनकारक आहे. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि आदिवासी प्रवर्गातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी साहित्याच्या एकूण किमतीपैकी १० टक्के लाभार्थी हिस्सा भरण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.

अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला, आधार कार्डची प्रत, आधार संलग्न बँक पासबुकची प्रत, ग्रामसभेचा ठराव, स्वयंघोषणापत्र, संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि वीजबिल जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व आदिवासी प्रवर्गातील महिलांसाठी जातीचा दाखला आवश्यक असून, सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना जातीच्या दाखल्याची आवश्यकता नाही.
बापुराव चौधरी उपसंपादक
