
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
लोणी काळभोर : सांगली येथे २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित पहिल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी दैदीप्यमान कामगिरी केली. पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूंनी एकूण सहा पदकांची कमाई करत लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यामध्ये चार सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोन खेळाडूंनी बेस्ट वेटलिफ्टरचा किताब पटकावला.

या स्पर्धेत ९ ते १२ वर्षे, १२ ते १४ वर्षे आणि २१व्या युथ गटातील मुले व मुलींच्या स्पर्धा पार पडल्या. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे ४०० खेळाडूंनी सहभाग घेतल्याने स्पर्धेत मोठी चुरस पाहायला मिळाली. सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या सात मुली व दोन मुले अशा एकूण नऊ खेळाडूंनी विविध वयोगटांत सहभाग नोंदवला.

पदक विजेत्यांमध्ये रिजा आसिफ शेख हिने १४ वर्षे व युथ गटात, नेत्रा भागवत थोरात हिने युथ गटात, तर सार्थक ज्ञानदेव इंदलकर याने युथ गटात सुवर्णपदक पटकावले. त्रिशा सुधीर काळभोर हिने १४ वर्षे गटात रौप्यपदक, तर आर्या अण्णाराव गायकवाड हिने युथ गटात कांस्यपदक मिळवले. याशिवाय रिजा शेख हिने १४ वर्षे गटातील, तर नेत्रा थोरात हिने युथ गटातील बेस्ट वेटलिफ्टरचा किताब पटकावून विशेष ठसा उमटवला.

ओवी अमर गिरी, मंजिरी अमित बोळे, जान्हवी सुहास पाटील आणि साईराज दीपक भुजबळ यांनीही स्पर्धेत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली. दरम्यान, रिजा आसिफ शेख, नेत्रा भागवत थोरात आणि सार्थक ज्ञानदेव इंदलकर यांची २७ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२७ या कालावधीत उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक गणेश विठ्ठल नगीने, अमर गणपत गिरी आणि नरेश गणपत गिरी यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्याने युथ मुलांच्या गटात सांघिक विजेतेपद, तर युथ मुली आणि १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सांघिक उपविजेतेपद मिळवले.
या यशाबद्दल अभिनव चेतना मंडळाचे अध्यक्ष हेमंत सोपानराव हाडके, तुषार नामदेव दौंडकर, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर, सचिव प्रशांत बेंद्रे, महाराष्ट्र केसरी राहुल रामचंद्र काळभोर, सरपंच नागेश काळभोर, हवेली तालुका वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष योगेश ज्ञानेश्वर उबाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी खेळाडूंचा सत्कार केला. तसेच राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बापुराव चौधरी उपसंपादक
