सुवर्णा कांचन मुख्य संपादक

उरुळी कांचन : बालकांना पोलिओमुक्त आणि निरोगी जीवन मिळावे, या उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सूर्यकांत हनुमंते आणि डॉ. सागर नाशिककर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. या केंद्रांच्या माध्यमातून पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना पोलिओचा डोस देण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

दरम्यान, उरुळी कांचन येथील डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्रातही पल्स पोलिओ मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या केंद्रात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांच्या हस्ते पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आशा आरोग्य सेविका सौ. सीमा चव्हाण, एमपीडब्ल्यू प्रतीक जगताप, अंगणवाडी कार्यकर्त्या सौ. मीरा लिंबोणे, परिचारिका सौ. प्रियंका कवडे आणि एमपीडब्ल्यू प्रमोद कोरडे उपस्थित होते. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी लसीकरण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पल्स पोलिओ मोहिमेच्या माध्यमातून बालकांना पोलिओपासून संरक्षण मिळावे आणि समाजात या आजाराचे पूर्णपणे उच्चाटन व्हावे, यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातूनही अनेक वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे राबविला जात असून, बालकांच्या आरोग्याप्रती सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले जात आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *