पुणे : भारताने २६ जानेवारी १९५० रोजी संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. संविधानामुळे सर्वसामान्य जनतेला मूलभूत अधिकार प्राप्त झाले असून प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय एकात्मता, विविधतेतून एकता आणि लोकशाही मूल्यांचा सण असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी केले.

उरुळी कांचन येथील एंजल हायस्कूलमध्ये आयोजित ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी या दिवशी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर व राष्ट्रभक्तांचे स्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी यज्ञ, दान, तप, निष्काम कर्मयोग साधत आपल्या प्राणांची आहुती दिली. या सर्वांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी भारताचा सुसंस्कृत वारसा जपावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अन्न, अक्षर, आरोग्य व आचरण याकडे विशेष लक्ष देऊन सुदृढ आरोग्य राखण्याचा संदेशही त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका रीना देशमुख, उपमुख्याध्यापिका प्रिशीला जॉन, श्वेता खाडे, सुनील रसाळ आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य व भाषणांच्या माध्यमातून आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी मुख्याध्यापिका रीना देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच संस्कारांची जोपासना करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *