
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील थेऊर-तारमळा पेठ-उरुळी कांचन-खामगाव टेक-हिंगणगाव-शिंदेवाडी (प्र. जि. मा. १३८) मार्गावरील हिंगणगाव येथे मुळा-मुठा नदीवर उभारण्यात येत असलेला पूल पहिल्याच पावसात कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेची दखल घेत शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदारांनी PMRDA आयुक्त अभिजीत चौधरी यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रात म्हटले आहे की, संबंधित पुलाचे बांधकाम मे. टी अँड टी इन्फ्रा लि., पुणे या ठेकेदारामार्फत सुरू असून काम पूर्ण होण्यापूर्वीच पूल कोसळणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पात अशी घटना घडल्याने बांधकामाची गुणवत्ता, संरचनात्मक सुरक्षितता, तांत्रिक निकषांचे पालन, कामावरील देखरेख तसेच संबंधित ठेकेदार, सल्लागार संस्था आणि पर्यवेक्षण करणाऱ्या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सार्वजनिक निधीचा पारदर्शक आणि कार्यक्षम वापर झाला का, याबाबतही शंका उपस्थित होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच पुलाच्या कोसळण्यामागील नेमकी कारणे शोधून बांधकामातील गुणवत्तेतील त्रुटी, निष्काळजीपणा, कराराच्या अटींचे उल्लंघन अथवा इतर कोणत्याही कारणासाठी संबंधित ठेकेदार, सल्लागार संस्था, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा किंवा जबाबदार अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमांनुसार कठोर प्रशासकीय, आर्थिक आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय या प्रकल्पाशी संबंधित सर्व तांत्रिक मंजुरी, डिझाइन, गुणवत्ता नियंत्रण अहवाल, वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता, पर्यवेक्षण व्यवस्था आणि संपूर्ण कार्यपद्धतीचे स्वतंत्र टेक्निकल अँड स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल आपल्या कार्यालयाला सादर करावा, अशी विनंती खासदारांनी PMRDA प्रशासनाकडे केली आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक
