सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : उच्च शिक्षणाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्सुकता, पालकांच्या डोळ्यांतील अपेक्षा आणि उज्ज्वल भवितव्याची आश्वासक चाहूल अशा उत्साहपूर्ण वातावरणात महंमदवाडी रोड (ससाणे वस्ती) येथील कै. सावित्रीबाई ससाणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्ष कला (बी.ए.), वाणिज्य (बी.कॉम.) आणि विज्ञान (बी.एस्सी.) शाखेच्या नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ‘इंडक्शन प्रोग्राम’ (स्वागत व परिचय कार्यक्रम) बुधवारी (ता. २२) उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गंगाधर सातव उपस्थित होते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची समृद्ध परंपरा, शैक्षणिक संस्कार, विविध उपक्रम, शिस्त आणि भावी वाटचालीची प्रेरणादायी ओळख करून देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

प्राचार्य डॉ. सातव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ पदवी संपादन न करता ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा समतोल साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमोल ससाणे आणि सचिव डॉ. अपर्णा ससाणे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. मेघना भोसले यांनी उच्च शिक्षणातील विविध संधी, अभ्यासाचे प्रभावी नियोजन आणि महाविद्यालयातील शैक्षणिक तसेच सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमास डॉ. अर्चना कुदळे, सहायक प्राध्यापक तेजस मोरे, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. नीता बोडके यांच्यासह प्राध्यापकवृंद उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या विषयांची, अभ्यासक्रमाची तसेच महाविद्यालयीन शिक्षणपद्धतीची सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक कोमल मोरे यांनी प्रभावी शैलीत केले, तर सहायक प्राध्यापक बालाजी भोई यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकेतर कर्मचारी सोहेल शेख आणि भाग्यश्री बोराटे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रथम वर्षातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत नव्या शैक्षणिक प्रवासाची आशादायी सुरुवात केली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *