पुणे : “ईश्वर सर्वव्यापी असून सृष्टीच्या कणा-कणामध्ये तो विराजमान आहे. या सत्याची सतत जाणीव ठेवून जीवन जगल्यासच आत्ममंथन व आंतरिक यात्रा शक्य होते,” असे प्रतिपादन निरंकारी सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी केले.

महाराष्ट्राच्या ५९व्या संत समागमाच्या पहिल्या दिवशी, २४ जानेवारी २०२६ रोजी सांगली ईश्वरपूर रोडलगत आयोजित भव्य समागमात त्या उपस्थित श्रद्धाळूंच्या विशाल जनसमुदायाला संबोधित करत होत्या.

जवळपास ३५० एकर परिसरात तीन दिवस चालणाऱ्या या समागमात महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक सहभागी झाले आहेत. सतगुरू माताजी म्हणाल्या की, भक्ती म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया आहे. मन निर्मळ करून, नम्रता व सहनशीलता हे गुण अंगीकारत मानवतेच्या मार्गावर चालणे, हेच खरे साधन आहे. संतांनी नेहमीच इतरांचे दोष न पाहता स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचा संदेश दिला आहे.

ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्ताच्या अंतःकरणात दया व करुणेचा भाव जागृत होतो, असे सांगत सतगुरू माताजी म्हणाल्या की, स्वतःच्या जीवनाचे कल्याण झाल्यानंतर इतरांपर्यंतही या ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याची प्रेरणा आपोआप निर्माण होते. आत्ममंथन हा केवळ बौद्धिक विचारांचा विषय नसून, तो हृदयातून होणारा अनुभव आहे.

मानवतेच्या भावनेने जगत असताना बाह्य व अंतर्गत प्रदूषण दूर करणेही आपले कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

समागमाच्या दुसऱ्या दिवशी भव्य सेवादल रॅलीचे आयोजन करण्यात आले. देश-विदेशातील हजारो सेवादल सदस्यांनी खाकी-निळ्या गणवेशात पी.टी.परेड, योगा, मल्लखांब, मानवी पिरॅमिड व सांस्कृतिक सादरीकरणातून शिस्त व सेवाभावाचे दर्शन घडवले.

पहिल्या दिवशी ‘ आत्ममंथन ’ समागम विशेषांक व ‘ गुरूदेव हरदेव’ पुस्तकाच्या नव्या भाषांतर आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले. समागमात येणाऱ्या भाविकांसाठी लंगर, कॅंटीन व पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, सेवाभाव व मानवतेचा संदेश देणारा हा समागम श्रद्धाळूंमध्ये विशेष उत्साह निर्माण करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *