पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथील मॅनेट इमारतीच्या प्रांगणात ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विशिष्ट सेवा मेडल (VSM) प्राप्त लेफ्टनंट जनरल व माजी महासंचालक, ऑर्डनन्स सेवा (DGOS) आर. के. कुशवाह (निवृत्त) यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र. कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना लेफ्टनंट जनरल आर. के. कुशवाह म्हणाले, “भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. भाषा, धर्म, संस्कृती आणि वयोमान यातील विविधता हीच आपली खरी ताकद आहे. हीच विविधता आज मला एमआयटी एडीटी विद्यापीठात अनुभवायला मिळाली.” तसेच विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, “आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. यश आणि अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते.”

कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “प्रजासत्ताक दिन हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. गतवर्ष भारतीय लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण ठरले असून विविध क्षेत्रांत देशाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घटनात्मक अधिकारांचा योग्य वापर करून विकसित भारताच्या उभारणीत योगदान द्यावे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाराष्ट्र नौदल शिक्षण व प्रशिक्षण अकादमी (मॅनेट) च्या कॅडेट्सनी केले. यावेळी एमआयटी सीबीएसई स्कूल व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *