
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : शिंदवणे (ता. हवेली) येथील शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘गणेश फेस्टिवल’चा उत्साहात शुभारंभ झाला. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि युवकांच्या विधायक सहभागाला चालना मिळावी, या उद्देशाने विविध सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सर्किट नाना’ शोला नागरिक, युवक व गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मंडळाचे आधारस्तंभ माजी सरपंच तथा पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आण्णा महाडिक व माजी सरपंच गणेश महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्ष पांडुरंग महाडिक यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

आलेल्या पाहुण्यांना लक्ष्मीतरू वृक्षाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, शिंदवणे येथील कु. तेजल शहाजी डोंबाळे यांची दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व महसूल सहाय्यक अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश महाडिक यांनी केले, तर सूत्रसंचालन समाधान अवचट यांनी केले.
बापुराव चौधरी उपसंपादक
