पुणे: दिवे घाट परिसरात सासवड रोडवर करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे दुपारपासून वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून अनेक तास उलटूनही ही वाहतूक सुरळीत झालेली नाही. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले.

दुपारच्या सुमारास दिवे घाटात रस्ते रुंदीकरण व डोंगर उत्खननाच्या कामासाठी ब्लास्टिंग करण्यात आले. मात्र, याबाबत योग्य पूर्वनियोजन न केल्याने आणि पर्यायी वाहतुकीची व्यवस्था न केल्याने सासवड, पुरंदर, जेजुरी तसेच पुण्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला. अवजड वाहने, खासगी चारचाकी, दुचाकी तसेच एसटी बसेस अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.

वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिकांना वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांची वाहनेही या कोंडीत अडकली होती.

उकाड्यामुळे वाहनांत अडकलेल्या प्रवाशांचा संताप व्यक्त होत होता. काही ठिकाणी वाहनचालकांनी रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ब्लास्टिंगसारख्या संवेदनशील कामांसाठी वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असले तरी अरुंद रस्ता, अवजड वाहने आणि मोठ्या प्रमाणातील वाहतूक यामुळे अडचणी येत आहेत. भविष्यात अशा कामांचे नियोजन करताना वेळेआधी सूचना देणे, पर्यायी मार्गांची व्यवस्था करणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *