पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील नद्यांच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकार विशेष लक्ष देत असून, पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळा–मुठा नदीच्या प्रदूषणावर लवकरच ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. ‘नमामी गंगा’प्रमाणेच पुण्यासाठी ‘नमामी मुळा–मुठा’ अशी स्वतंत्र योजना आखून नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी दिली.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठांतर्गत कार्यरत महाराष्ट्र नौदल शिक्षण व प्रशिक्षण अकादमी (मॅनेट), पुणे यांच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रोव्होस्ट सायली गणकर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी उपस्थित होते.
चौधरी म्हणाले की, मुळा–मुठा नदीत प्रक्रिया न करता सोडले जाणारे सांडपाणी, तसेच नदीपात्रात टाकला जाणारा कचरा ही गंभीर बाब असून, त्यामुळे पुणे शहरातील भूजल पातळी, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ही समस्या अधिक गंभीर होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून सर्वंकष नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता वाढविणे, अवैध सांडपाणी जोडण्या तोडणे, तसेच औद्योगिक घटकांकडून होणाऱ्या प्रदूषणावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जलगुणवत्तेचे नियमित निरीक्षण केले जाईल. तसेच नदीकाठावरील गावांमध्ये कचरा थेट नदीत टाकला जाणार नाही, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मुळा–मुठा नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून पुण्याचा सांस्कृतिक व पर्यावरणीय वारसा आहे. त्यामुळे नदी संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून, नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे चौधरी यांनी नमूद केले.

दरम्यान, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी सांगितले की, एमआयटी एडीटी विद्यापीठाने मुळा–मुठा नदीतील वाढत्या प्रदूषणाबाबत सातत्याने राज्य व केंद्र सरकार तसेच स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मुळा–मुठा ही पुण्याची जीवनवाहिनी असून, तिच्या संरक्षणासाठी व स्वच्छतेसाठी विद्यापीठ प्रशासन आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
याशिवाय, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि युवकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून, “ स्वच्छ नदी, सुरक्षित भविष्य ” या संकल्पनेतून मुळा–मुठा नदीला पुन्हा निर्मळ व प्रवाही करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला असल्याचे राज्यमंत्री चौधरी यांनी स्पष्ट केले.