पुणे : काही वर्षांपूर्वीपर्यंत कॉस्ट अकाउंटंट्सची भूमिका ही कंपन्यांच्या आर्थिक ऑडिट व फायनान्शियल अकाउंटिंगपुरती मर्यादित होती. त्यामुळे हे कार्य बॅक ऑफिस स्वरूपाचे मानले जात होते. मात्र बदलत्या काळात दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) मुळे या क्षेत्राचा व्याप व महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले असून देशाच्या आर्थिक विकासात कॉस्ट अकाउंटंट्सचा सक्रिय सहभाग वाढत आहे, असे प्रतिपादन रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य वित्त अधिकारी रजनीश जैन यांनी केले.

ICMAI तर्फे पुण्यात आयोजित ‘ RISE इंडिया लीडरशिप समिट’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ICMAI चे करिअर काऊन्सेलिंग व प्लेसमेंट कमिटीचे अध्यक्ष CMA विनय रंजन, उपाध्यक्ष नीरज जोशी, माजी अध्यक्ष बी.बी. नायक, CMA चैतन्य मोहरीर (सचिव – ICMAI-WIRC) आणि CMA श्रीकांत इप्पलपल्ली (अध्यक्ष – ICMAI पुणे चॅप्टर) उपस्थित होते.
जैन म्हणाले की, आज कॉस्ट अकाउंटंट्स कंपन्यांच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ICMAI मुळे लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून देशाच्या आर्थिक उलाढालीत सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे योगदान शक्य झाले आहे. ‘विकसित भारत’ घडवण्यात ICMAI चा मोठा वाटा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

CMA विनय रंजन यांनी सांगितले की, ICMAI आणि कॉस्ट अकाउंटंट्सचा देशाच्या आर्थिक उलाढालीत सुमारे दोन टक्के वाटा असून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उद्दिष्टात संस्थेचे योगदान निर्णायक ठरेल.
नीरज जोशी यांनी अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करण्यात येत असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात गुणवत्तापूर्ण कॉस्ट अकाउंटंट्स घडवण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले.
उद्घाटनानंतर झालेल्या चर्चासत्रात ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्समधील धोरणात्मक नेतृत्व : मूल्यनिर्मितीचे शिल्पकार म्हणून CMAs’ या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. परिषदेत GCC कंपन्यांचे प्रतिनिधी, CFO आणि HR प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.